
बीजनिर्मिती, विविध हार्मोन्सचे संतुलन, स्त्रीबिजाची वाढ, नियमित पाळी येणे याकरिता आहारात अनेक पोषक घटक, खनिजे, जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांची गरज असते. आजच्या स्त्रीचे आयुष्य आणि पन्नास वर्षांपूर्वीचे स्त्रीचे आयुष्य यात खूप फरक पडला आहे. हजारो वर्षांच्या बेड्या तोडून स्त्री आज स्वतंत्र झाली आहे. कुटुंब आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर लढताना तिची दमछाक होते आहे. त्यामुळे तिच्या शरीराला जास्त उर्जेची, जास्त जीवनसत्वांची, जास्त खनिजांची गरज असते. मात्र तिच्या अन्नात तितके पोषक घटक असतात का?

इन्शुलीन निष्प्रभ (इन्शुलीन रेझिस्टन्स)
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंडामध्ये (पँनक्रिया) इन्शुलीनची निर्मिती होत असते. इन्शुलीन रेझिस्टन्स म्हणजे शरीरातील पेशींनी इन्शुलिनला दाद न देणे. इन्शुलीन निष्प्रभ झाल्याने ग्लुकोज/शर्करा शरीराच्या पेशींमध्ये सहजासहजी प्रवेश करू शकत नाही. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शरीर अधिकाधिक इन्शुलीन निर्माण करते. इन्शुलीन हे शरीराची वाढ घडवून आणणारे हार्मोन आहे, आणि ते अतिप्रमाणात वाढल्याने स्त्री बिजाकोशात टेस्टोस्टेरॉन आणि इतर अँन्ड्रोजेनिक (पुरुषी) हार्मोन्सची निर्मिती होऊ लागते. टेस्टोस्टेरॉन हे पुरुषी हार्मोन आहे. त्याचा परिणाम म्हणून वजन वाढणे, चेहेऱ्यावर केस येणे, मुरूम येणे ही लक्षणे दिसतात. वाढलेल्या वजनामुळे इन्शुलिनचे प्रमाण आणखी वाढते आणि वजन कमी करणे खूपच अवघड होऊन जाते.
इन्शुलीन निष्प्रभतेची लक्षणे :
- दिवसभरात उत्साह सतत कमी जास्त होणे
- वारंवार भूक लागणे
- सतत गोड खावेसे वाटणे
इन्शुलीन निष्प्रभ होण्याची कारणे :
- एका वेळेस जास्त खाणे. बैठ्या जीवनशैलीत आहाराची पोर्शन साईझ (एक वेळेच्या जेवणाचे प्रमाण/हिस्सा/वाटा) कमी असणे गरजेचे असते.
- आहारात कार्बोहायड्रेटस/कर्बोदके विशेषतः प्रक्रिया केलेले कर्बोदके (मैदा, पाँलिश केलेला तांदूळ इ.) चे प्रमाण जास्त असणे.
- जंक फूड उपलब्ध असणे – बाजारू अन्नात उष्मांक (कँलरीज्) जास्त असतात मात्र पोषणमूल्ये अतिशय कमी असतात.
- फळे, भाज्या, धान्ये या सारखे फारसे उष्मांक न देणारे पदार्थ कमी खाणे.
- नियमित वेळेनंतर माफक आहार, कमी जी आय युक्त आहार, दिवसभराच्या आहारात कार्बोदकांची केलेली योग्य विभागणी करणे, इ आहार नियम न पाळणे.
- गोड, प्रक्रिया केलेले अन्न घेणे, ज्यामुळे इन्शुलिनची पातळी अचानक वाढते.
- सततचा ताण तणाव
